होम  »  व्हिडिओ»कात्रज दुर्घटनेला जबाबदार कोण ?
कात्रज दुर्घटनेला जबाबदार कोण ?
Rate this video
3 Average Rating
URL:
Embed:

पुणे 12 जून : कात्रजजवळ शिंदेवाडीमधल्या दुर्घटनेमध्ये वाहून गेलेल्या संस्कृती वाडेकरचा मृतदेह अखेर सात दिवसांनी सापडला. कात्रज बोगद्याजवळ पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यात संस्कृती वाहून गेली होती.या दुर्घटनेनंतर संस्कृतीचा शोध घेण्यासाठी फायर ब्रिगेडचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पण रात्री तीनच्या सुमारास फायर ब्रिगेडच्या कर्मचार्‍यांनी शोध थांबवला होता. अखेर कुटुंबीयांनी शोध घेतला तेव्हा संस्कृतीचा मृतदेह झाडीत सापडला. पण या प्रकरणी आता आई-लेकींच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झालाय.


किसन राठोड यांच्यावर गुन्हा दाखल


 तर या दुर्घटनेला जबाबदार धरत टाटा मोटर्स शोरूमचे मालक आणि कात्रज डोंगरावर होत असलेल्या पुणे हिल्स या प्रकल्पाचे प्रवर्तक किसन राठोड आणि त्यांच्या भावावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या बांधकामावर कारवाई करण्यात आलीय. पण आपल्याविरुद्ध काही महसूल अधिकारी सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप राठोड यांनी केला. कसलंही अतिक्रमण किंवा अनिधकृत बांधकाम केलेलं नाही, नियमानुसारच बांधकाम केल्याचं राठोड यांचं म्हणणं आहे. राठोड यांच्यावर यापूर्वीही खनिज चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि 56 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. पण राठोड यांनी कोर्टात आव्हान दिल्याने या कारवाईला स्थगिती मिळाली होती. आता राठोड यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केलीय. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष असलेल्या राठोडांनी राजकीय लागेबांधे असल्याचे आरोपही फेटाळून लावले आहे.

कात्रजच्या डोंगरावर 'बाबू'लोकांच्या जमिनी


कात्रज दुर्घटनेप्रकरणी राठोड बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या घटनेच्या मुळाशी असलेलं मुख्य कारण म्हणजे कात्रज बोगद्याजवळ असलेल्या डोंगराची लचकेतोड... शिंदेवाडी परिसरात जवळपास 200 एकर जागेत हा डोंगर पसरला आहे. यापैकी 75 एकर जागेवर किसन राठोड यांच्या टाटा मोटर्स शोरुमचं बांधकाम आहे. पण IBN लोकमतच्या हाती शिंदेवाडी गावातील 112 -अ या जागेचा संपूर्ण सातबाराच हाती लागला. आणि विशेष म्हणजे या डोंगरावर अनेक सरकारी अधिकार्‍यांचीच गुंतवणूक असल्याचं या कागदपत्रावरून स्पष्ट झालंय. यात महसूल विभागातील अधिकार्‍यांपासून ते पोलीस अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. सरकारी अधिकार्‍यांनी जमिनीत गुंतवणूक करणं बेकायदेशीर नसलं तरी डोंगर टेकड्यांवर गुंतवणूक करणं पर्यावरणदृष्ट्या योग्य नाही, असं पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.


अतिक्रमण कारवाईला सुरूवात


कात्रजजवळ शिंदेवाडीमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनानं अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात केली. खेड शिवापूरपासून या कारवाईला कालपासून सुरुवात झाली आहे. आज दुसर्‍या दिवशीही ही कारवाई सुरु राहिली. रस्ता रुंदीकरणासाठी या ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येणार होती. आता या दुर्घटनेनंतर तातडीने या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कात्रज बोगद्यापर्यंत ही अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे.
 

Your Comments:

Name
Email:
Country: