अमोल परचुरे, समीक्षक
31 मे
'बदतमीज दिल..', 'बलम पिचकारी' या गाण्यांमुळे आणि अर्थात सिनेमाच्या कास्टमुळे बहुचर्चित असलेला 'ये जवानी है दिवानी...' हल्ली अपेक्षा ठेवल्या की हमखास अपेक्षाभंग होण्याची भीती असते. 'ये जवानी है दिवानी' बघून अपेक्षाभंग जरी होत नसला तरी अपेक्षा पूर्णही होत नाहीत. ज्याने 'स्वदेस'ची पटकथा लिहीली होती, ज्याने 'वेकअप सिड' सारखा चांगला सिनेमा दिग्दर्शित केला होता त्या अयान मुखर्जीचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा सिनेमा..अयानकडून अपेक्षा होत्या पण त्याच त्या घिस्यापिट्या वाटेवरची एक प्रेमकहाणी त्याने नवीन साच्यात सादर केली. रणबीर, दिपिका आणि कल्कीच्या सुंदर अभिनयाने सिनेमा सावरण्याचा प्रयत्न झालाय पण सिनेमाची लांबी वाढल्याने हा प्रयत्नही अपुरा पडलाय.
काय आहे स्टोरी ?
जगावेगळी स्वप्नं पाहणारा आणि ती पूर्ण करण्याची धमक असलेला स्वच्छंदी 'बन्नी'(रनबीर) या सिनेमाचा नायक आहे. अशा स्वच्छंदी नायकाच्या व्यक्तिरेखा अनेकदा याआधी येऊन गेल्या आहेत. सिनेमाची नायिका आहे 'नैना तलवार'(दिपिका), चष्मा घालणारी, सभ्य आणि एकदम अभ्यासू मुलगी, तिला बघताच लक्षात येतं की, तिच्या वागण्यात बरंच परिवर्तन होणार आहे ते...बन्नी, आदिती आणि असे तिघेजण मनालीला ट्रेकला जायला निघतात आणि त्यांना नैनासुद्धा येऊन मिळते आणि मग इंटरव्हलपर्यंत मनालीमध्ये सुरु असलेली चौघांची मजा-मस्ती दिसते.
लग्नसंस्थेवर अजिबात विश्वास नसलेला बन्नी नैनाला आवडायला लागतो. मग टूर संपल्यावर चौघांचं आपापलं जग सुरु होतं. 'जुदाई', 'यादें', 'दूर रहते हुए भी अपनों की याद' वगैरे टिपिकल ट्रॅक सुरु होतो. करण जोहरचा सिनेमा असल्यामुळे मग उदयपूरमधल्या पॅलेसमध्ये बिग फॅट इंडियन वेडिंग सुरु होतं जे बराच वेळ सुरु राहतं. मेहंदी, संगीत असा सगळा थाटमाट दिसत राहतो आणि जोडीने कथाही पुढे पुढे सरकत राहते. अर्थातच, या सगळ्याचा शेवट काय होणार हे माहित असल्यामुळे आपला इंटरेस्ट हळूहळू कमी व्हायला लागतो. प्रेम, आयुष्य, करिअर, स्वप्नं याबद्दलची तरुणाईची तीच-तीच फिलॉसॉफिकल बडबड ऐकण्यावाचून आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो.
नवीन काय ?
'ये जवानी है दिवानी' हा सिनेमा दहा वर्षांपूर्वी रिलीज झाला असता तर नक्कीच वेगळा आणि अगदी नव्या पिढीचा सिनेमा वाटला असता, पण गेल्या दहा वर्षांत अनेक नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी आजच्या तरुणाईची प्रेमकहाणी वेगवेगळ्या प्रकारे सादर केली आहे. त्यामुळे 'ये जवानी है दिवानी'च्या कथेत, सादरीकरणात नावीन्य काहीतच राहिलेलं नाही. बाकी मनाली, व्हेनिस, पॅरिस अशा स्थळांचं सौंदर्य बघायला बरं वाटतं पण त्याच्या जोडीला कथेवरसुद्धा नव्याने विचार झाला असता तर बरं झालं असतं.
ऍक्टिंग -रिऍक्टिंग !
'ये जवानी है दिवानी'चं बलस्थान आहे प्रमुख कलाकारांचा उत्तम अभिनय...रॉकस्टार आणि बर्फीप्रमाणे हा रोल रणबीरसाठी आव्हानात्मक वगैरे नाहीये, पण अभिनयातून स्वच्छंदीपणा त्याने मस्त दाखवला. दीपिका पदुकोण अभ्यासू आणि बिनधास्त अशा दोन्ही रुपात छान दिसली आणि तिने अभिनयही चांगलाच केलाय. कल्की आणि आदित्य रॉय कपूर, कुणाल रॉय कपूर यांचाही अभिनय सिनेमाच्या प्रकृतीला छान मॅच झालाय. बाकी दोन गाणी सोडली तर लक्षात राहणारं संगीत नाही. माधुरी दीक्षितचं आयटम साँग उगाचच घुसडण्यात आलंय. अशा उगाचच असलेल्या गोष्टींनी भरलेला, ऍक्टर्सनी काही प्रमाणात तारलेला हा सिनेमा टीव्हीवर येण्याची वाट बघू शकता..
'ये जवानी है' दिवानी'ला रेटिंग - 60




