होम  »  ब्लॉग स्पेस

ब्लॉग स्पेस

राज ठाकरे,नरेंद्र मोदी आणि इमरान खान !
May 18, 2013
राज ठाकरे,नरेंद्र मोदी आणि इमरान खान !
Posted by .जतीन देसाई | {1} कॉमेन्ट्स

इमरान खान, राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी....इमरान खान पाकिस्तानी पण या तिघांमध्ये प्रचंड साम्य आहे. त्यांची तुलना देखील करता येईल. पाकिस्तानच्या निवडणुकीत त्सुनामी येईल, असा दावा इमरान खाननी केलेला. मात्र, तिथे त्सुनामी वैगेरे काही आली नाही. पंतप्रधान बनण्याच इमरान खानच स्वप्न साकार झालं नाही. ही वस्तुस्थिती असताना देखील इमरान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या.

 


राज ठाकरे, नरेंद्र मोदी आणि इमरान खान मधील सर्वात मोठं साम्य म्हणजे या तिन्ही नेत्यांकडे असलेलं टीआरपी मुल्य. म्हणजे, जेव्हा त्यांना टीव्ही चॅनलमध्ये दाखवलं जात तेव्हा टीव्ही पाहणार्‍यांची संख्या खूप वाढते. संबंधीत चॅनलला त्याची मदत होते. म्हणजे त्याची लोकप्रियता वाढते आणि त्या सोबत त्या नेत्याचं म्हणणं लोकांपर्यंत सहजरित्या पोहचतं. मीडिया व्यवसायात टीआरपीच महत्त्व यासाठी देखील आहे की, त्याचा जाहिराती मिळवण्यास उपयोग होतो. सर्व चॅनल्समध्ये टीआरपीची स्पर्धा असते. अनेकदा टीआरपीसाठी बातम्यांशी काही संबंध नसलेल्या गोष्टी देखील दाखविल्या जातात.


वर उल्लेख केलेल्या तिन्ही नेत्यांचा तरूण वर्गावर प्रचंड प्रभाव आहे. राज ठाकरे सोबत सर्व वर्गातली तरूण मुलं आहेत. नरेंद्र मोदी सोबत प्रामुख्याने माध्यम आणि वरच्या वर्गातली शहरी तरूण मोठ्या प्रमाणाने आहेत. तर, इमरान खानच्या सोबत पाकिस्तानातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व वर्गातील तरूण आहेत. पाकिस्तानातील तरूण अतिरेकी आणि हिंसाचाराच्या कंटाळली आहे. त्यांना इमरान खाननी 'नया पाकिस्तान'च स्वप्न दाखवलं. तालिबानला न घाबरता ही तरूण मुलं पीटीआयच्या झेंडा घेऊन फिरत होती. तालिबान किंवा इतर अतिरेकी संघटनेच्या विरोधात इमरान खाननी काहीही स्पष्ट भूमिका घेतली नाही.

 

याचा विचार या तरूणांनी फारसा केला नाही. त्यांच्यासाठी इमरान खान प्रस्थापितांच्या विरोधात बोलतो एवढं पुरेसं होतं. 'नया पाकिस्तान' या भावनिक स्लोगननी ते भारावून गेलेले. यशस्वी क्रिकेटर ते कॅन्सरची अत्याधुनिक हॉस्पिटल चांगल्या प्रकाराने चालवणारा इमरान खान लोकांना आणि त्यातल्या त्यात तरूण व महिलांना आकर्षित करणं स्वाभाविक आहे. लोकांना आकर्षित करण्याच्या त्याच्या शक्तिमुळे त्याला टीआरपी मुल्य. या मुल्यामुळे पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सनी इमरानच्या प्रत्येक सभेला महत्त्व दिलं.

 


तसंच नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंच्या बाबतीत आपल्याला दिसतं. त्यांच्या सभेचं वेगवेगळ्या चॅनल्समधून जिवंत प्रसारण केलं जातं. भारतात मीडिया व्यवसाय मोठ्या प्रमाणाने वाढतोय. नवीन नवीन चॅनल्स येत आहेत. चॅनल्स सुरू करणं सोपं असतं पण त्याला चालवणं सोपं नसतं. चॅनल यशस्वी होण्यासाठी त्याच्या टीआरपीत वाढ होणं आवश्यक आहे. टीआरपीत पुढे असणार्‍याला स्वाभाविक जास्त जाहिराती मिळते. या शिवाय, या तिन्ही नेत्यांकडे अप्रतिम बोलण्याची शैली आहे.

 

आपल्या श्रोत्यांवर ते आपला प्रभाव पाडतात. श्रोत्याना देखील आक्रमक बोलणारा वक्ता आवडतो. नया पाकिस्तानबद्दल बोलत असताना प्रस्थापित नेत्यांवर इमरान कडाडून टीका करतो. तरूण वर्गाला बदल हवा असतो. बदलासाठी मेहनत करण्याची त्याची तयारी असते. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे देखील आक्रमक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

 

नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक सभेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारवर प्रचंड आणि काही वेळेस विशारी टीका करतात. राज ठाकरे आपल्या सभेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी वाया घालवत नाही. तिन्ही नेत्यांमधला हा आक्रमकपणा लोकांना आवडतो. आक्रमकतेतूनच आपले प्रश्न सुटू शकतात अशी लोकांची मानसिकता झाली आहे.


राज ठाकरे आणि इमरान खानानं दुसरं साम्य म्हणजे त्यांची स्वत:ची वेगळी ओळख देखील आहे. इमरान हा पाकिस्तानच्या यशस्वी कॅप्टन तर राज ठाकरे अप्रतिम कार्टुनिस्ट. इमरानच्या क्रिकेटर म्हणून पाकिस्तानी जनतेवर करिश्मा होता आणि आजही तो करिश्मा आपल्याला जाणवतो. कार्टुनिस्ट म्हणून राज ठाकरे आपल्याला जे काही सांगायच आहे ती कमी शब्दात सांगू शकतो. ही एक कला आहे. एका कार्टुन प्रमाणे एक वाक्य देखील तेवढंच परिणामकारक ठरू शकतं.


नरेंद्र मोदींकडे भाजपातील अनेक लोकं आणि काही उद्योजक पंतप्रधान बनण्याची क्षमता असलेला नेता म्हणून पाहतात. पण, मोदींसाठी दिल्ली जवळ नाही. अद्याप भारत कृषिप्रधान देश आहे आणि बहुसंख्य लोकं ग्रामीण भागात राहतात. उद्योजक देशाचे पंतप्रधान ठरवत नाही. इमरान खानला देखील वाटलं होतं की, पाकिस्तानात निवडणुकीत त्सुनामी येईल आणि तो पंतप्रधान होईल.

 

पण, तसं झालं नाही. नवाझ शरीफ यांचा अनुभव त्यांच्या कामी आला आणि त्यांच्या पक्षाने प्रचंड यश मिळवलं. नरेंद्र मोदी भारतात त्सुनामीची आशा बाळगत असतील तर त्यांनी इमरान आणि कर्नाटकच्या निवडणुकातून शिकलं पाहिजे. मात्र, करिश्मा नेत्यांना सत्तेवर नेत नाही ही वस्तुस्थिती आहे.
 

प्रतिक्रिया

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]