होम  »  कार्यक्रम हे पाहाच

हे पाहाच

अजेंडा महाराष्ट्र
  कार्यक्रम वेळ : Jun 03, 2013
05:30 AM
अजेंडा महाराष्ट्र
अजेंडा महाराष्ट्र
आपल्यात क्षमता आहे, आपलं मोठं राज्य आहेत आता खरं तर महाराष्ट्राने संपन्न राष्ट्रासारखा विचार करायला शिकलं पाहिजे. जवळजवळ 50 टक्के लोकं नागरी भागात राहतात. महाराष्ट्र म्हणजे ग्रामीण भाग, खेडी हा विचार आता बदलावा लागेल. भावी महाराष्ट्राचे चित्र ज्यांच्या नजरेतून आपण पाहत आहोत त्या नव्या पिढीला संधी देणं गरजेच आहे. त्यांच्या आशा आकांक्षा,अपेक्षा, इच्छा वेगळ्या आहेत. त्यांना देखील 'इंडिया स्टोरीचा' भाग बनायचं आहे. त्यामुळे या नव्या पिढीला सोबत घेऊन महाराष्ट्र राष्ट्राची पायभरणी आपल्याला करायची आहे अशी साद राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आयबीएन लोकमत आयोजित 'अजेंडा महाराष्ट्र'या परिषदेत ते बोलत होते. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल आयटीसी ग्रँड हयातमध्ये मोठ्या दिमाखात परिषद पार पडली. या परिषदेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जेष्ठ उद्योगपती, मंत्री, अधिकारी, विचारवंत आणि नागरिक या परिषदेत सहभागी होते.


 
आयबीएन लोकमत.. आणि महाराष्ट्र.. एक अतूट नातं..गेल्या 5 वर्षांत आयबीएन लोकमतने दाखवला महाराष्ट्राचा देदिप्यमान इतिहास आणि वर्तमानातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी. पण आता आम्ही घेऊन आलो आहोत स्वप्न महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचं. अजेंडा महाराष्ट्र या खास मोहिमेतून महाराष्ट्रातले नेते, अधिकारी, उद्योगपती, विचारवंत आणि नागरिक आज एका छताखाली जमले आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल आयटीसी ग्रँड हयात मध्ये अजेंडा महाराष्ट्र ही परिषद मोठ्या दिमाखात पार पडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत, राज्याचे गृहनिर्माण मंत्री सचिन अहिर यांनी दिप प्रज्वलन करून परिषदेला सुरूवात केला. परिषदेच्या पहिल्या सत्रात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत उपस्थिती मान्यवरांनीही सहभागी होऊन महाराष्ट्राच्या विविध विषयांवर आपली मत नोंदवली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ,सिंचन, औद्योगिक आणि शिक्षणावर आपली भूमिका मांडली.

 

...तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केली असती -मुख्यमंत्री


"महाराष्ट्रात 18 टक्के जमीन सिंचन क्षेत्राखाली सिंचित आहे आणि 82 टक्के जमिनी कोरडवाहू असून निर्सगाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. या वर्षी सलग दुसर्‍यांदा राज्यातील एक तृतीयांश भागामध्ये 15 जिल्ह्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. या भागामध्ये नेहमी दुष्काळ पडत असतो. पण यंदा अचानक सलग दोन वर्ष दुष्काळ पडल्यामुळे वेगळी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या सिंचनाची इतर राज्यांसोबत तुलना केली तर पंजाबमध्ये 98 टक्के, युपी, बिहारमध्ये 60 ते 70 सिंचन परिस्थिती आहे. देशाच्या सरासरी इतकी जरी सिंचनाची परिस्थिती आपल्याकडे असती तर आज परिस्थिती वेगळी असती. कृषी क्षेत्रात आपण काय केलं असतं याची कल्पना आपल्याला येते. "

सर्वाधिक गुंतवणूक राज्यात - मुख्यमंत्री


"महाराष्ट्राचा औद्योगिक क्रमांक कायम टिकवावा लागेल. सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन,रोजगार, निर्यात तसंच थेट परदेशी गुंतवणूक कोणीही काही म्हटलं तरी सर्वात जास्त आपल्याकडे आहे. अर्थात आपण स्वस्थ बसून चालणार नाही. इतर राज्य आता स्पर्धेत उतरली आहे आणि चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे महाराष्ट्राचा औद्योगिक दर्जा कायम ठेवणे, सुशिक्षित तरूणांना रोजगार देणं आणि त्याच बरोबर राज्यातील काही भागांचा औद्योगिक दृष्टीने मागासलेलापणा आहे तो दूर घालवण्यासाठी आपल्याला प्राध्यान्य द्यावं लागेल."


गुणवत्ता वाढवावी लागेल - मुख्यमंत्री


"उद्योग क्षेत्रात जागतिक स्पर्धा करायची असेल तर तिथं काम करणारा युवका हा तो कौशल्यपूर्ण असावा, त्याला शिक्षणाचं परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. त्यामुळे गुणवत्ता वाढली तर रोजगार वाढेल त्यामुळे रोजागारच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. त्या दृष्टीने गुणवत्ता वाढवणे गरजेच आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षणाची सांगड असणे गरजेच आहे. पण आज जर परिस्थिती पाहिली तर शिक्षणाच्या बाबतीत समाधानकारक परिस्थिती नाहीय. जर औद्योगिक क्षेत्रात प्रथम क्रमांक टिकवायचा असेल तर शिक्षणाचा दर्जा वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी चांगले शिक्षक, विद्यार्थी, सोई- सूविधा देणं महत्त्वाचं आहे. विद्यापीठाच्या बाबतीतही महाराष्ट्राची परिस्थिती समाधानकारक नाही. देशात प्रमुख विद्यापीठाच्या यादीत आपलं एकही विद्यापीठ नाही. जगाशी स्पर्धा केली तर उच्चशिक्षित 500 विद्यापीठाच्या यादीतही आपल्या एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीत आपल्याला ठोस पावलं उचलावी लागणार आहे. "

प्रतिक्रिया कळवा
विषय / कार्यक्रम
प्रतिक्रिया
नाव
ईमेल
शहर
दूरध्वनी